महाराष्ट्र निर्यातदार परिसंस्था

तथ्ये
२०२३-२४ या आर्थिक वर्षात ५.५६ लाख कोटी रूपये मूल्याची अर्थात भारतातील एकूण निर्यातीपैकी १५.३७% निर्यात करणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक निर्यात करणारे राज्य आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे आणि ठाणे हे राज्यातील निर्यात करणारे आघाडीचे जिल्हे असून राज्याच्या एकूण निर्यातीमध्ये त्यांचे योगदान ७४% इतके आहे.
अमेरिका, यूएई, हाँगकाँग, बेल्जियम, यूके, चीन, इटली, नेदरलँड, जर्मनी आणि मेक्सिको हे दहा देश महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त आयात करणारे देश आहेत.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हे हे निर्यात करणारे जिल्हे आहेत, आणि ते एअर कार्गो टर्मिनल्स आणि फ्री ट्रेड झोनद्वारे जोडले गेले आहेत. २०२२-२३ या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात निर्यातीत उत्कृष्ट वाढ नोंदवणारे महाराष्ट्रातील आघाडीचे पाच जिल्हे पुढीलप्रमाणे – अमरावती (१०८%), चंद्रपूर (९३%), वाशिम (३४%), वर्धा (२८%) आणि सिंधुदुर्ग (२४%)
महाराष्ट्राच्या निर्यातीत योगदान देणारी मुख्य क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत – रत्ने आणि दागिने (२२.८४%), अभियांत्रिकी (११.३९%), इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल घटक (१७.३०%), रसायने (१०.०९%) आणि फार्मास्युटिकल्स (५.७५%).
कामगिरी
नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या निर्यात सुसज्जता निर्देशांक (EPI) क्रमवारीत महाराष्ट्र राज्याने २०२२ या वर्षात दुसरे स्थान पटकावले आहे. या अहवालानुसार निर्यात परिसंस्थेला आधार आणि निर्यात पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त एनएबीएल-मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत. यात ५९९ प्रयोगशाळा आणि ५५ एनएबीसीबी प्रमाणन तपासणी संस्था आहेत.
जागतिक बाजारपेठेत राज्यातील निर्यातदारांचा प्रवेश सुलभ करण्यासाठी महाराष्ट्राने आपल्या निर्यातदारांसाठी सर्वात जास्त व्यापार मेळावे/प्रदर्शने (११०) आणि क्षमता निर्माण कार्यशाळा (६४२) आयोजित केल्या आहेत.
